महत्वाच्या बातम्या

 वसतिगृह, आधार व स्वयंम योजनांसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ 


- विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्जाची सुविधा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे अर्ज सादर करता न आलेल्या विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

शैक्षणिक सत्र २०२६- २०२६ साठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नव्हते. या पार्श्वभूमीवर विभागाच्या बैठकीत ऑनलाईन प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार, बारावीनंतर पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह, आधार व स्वयंम योजनांसाठी ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरून त्याची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृह किंवा कार्यालयात जमा करावीत.

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आधार व स्वयंम योजनेचा लाभ -
वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेनुसार (मेरिट लिस्ट) पूर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ मिळणार नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत लाभासाठी रूपांतर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी. तसेच ऑफलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृह किंवा कार्यालयात मुदतीपूर्वी सादर करावीत.

जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक रोहन कांबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल किंवा सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नागपूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.





  Print






Related Photos