महत्वाच्या बातम्या

 अवैध पाणी उपसावर कारवाई, चारा व पाणी व्यवस्थेचे नियोजन करा : जिल्हाधिकारी वान्मथी सी


- हिंगणघाट येथे विधानसभास्तरीय पाणी टंचाई आढावा बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या अध्यक्षतेखाली हिंगणघाट येथे विधानसभास्तरीय पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत हिंगणघाट, समुद्रपूर व सेलू तालुक्यातील पाणी टंचाईची सद्यस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, अवैध उपसा कारवाई, चारा नियोजन तसेच आगामी काळातील संभाव्य परिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला. अवैध पाणी उपसा, चारा व पाणी व्यवस्थेचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण तसेच विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी, तिनही तालुक्यांचे तहसिलदार, मुख्याधिकारी, जलसंपदा व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी, ग्रामसेवक तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विभागातील विविध गावांमधील पाणी स्रोतांची स्थिती, विहिरी व बोअरवेलची पातळी, तलावांमधील पाणीसाठा, टँकरची सद्याची संख्या व गरज तसेच पाणी टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीची माहिती सादर केली.

अवैध पाणी उपसावर कारवाई -
बैठकीत नद्या, कालवे, तलाव व इतर जलस्रोतांमधून होणाऱ्या अवैध उपसावर कठोर व तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अवैध उपसा शोधून काढणे, त्वरित बंद करणे, वाहने, पंप व उपकरणे जप्त करणे, संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षणबाबत ठोस पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणांना अवैध उपसा विरोधात तत्काळ कारवाई करण्याचे व स्रोत संरक्षणासाठी समन्वय साधण्याचे निर्देश दिले.

जनावरांसाठी चारा नियोजन -
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. पशुसंवर्धन विभागाने चारा छावण्यांची आवश्यकता, हिरवा व कोरडा चारा उपलब्धता, चारा वितरणाची सद्यस्थिती आणि ग्रामस्तरावर करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती सादर केली. जिल्हाधिकाऱ्यांनी चाऱ्याची टंचाई होऊ नये यासाठी आगाऊ नियोजन करून आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. 

पाणी बचतीसाठी जनजागृतीवर भर -
जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी टंचाईग्रस्त गावांची अद्ययावत यादी तयार करून तातडीने पाणी स्रोत मजबूत करणे, पाणी बचतीसाठी जनजागृती करणे आणि नागरिकांना पिण्याचे पाणी नियमित मिळेल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाणी स्रोतांचे बळकटीकरण आणि ग्रामपंचायतस्तरावर पाणी व्यवस्थापनासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.





  Print






Related Photos