महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानांतर्गत पवनी येथे युवकांना शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन


- रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या संधींबाबत ३४ विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
प्रतिनिधी / भंडारा : राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या वतीने युवक-युवतींमध्ये रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेशी संबंधित शासकीय योजना व उपक्रमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत १२ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय, पवनी येथे माहिती व मार्गदर्शन स्टॉल लावण्यात आला. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी विजय पांडव आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) जिल्हा समन्वयक अतुल पडोळे यांनी स्टॉलला भेट देऊन उपस्थित विद्यार्थी व युवकांना विविध शासकीय योजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी सेवायोजन कार्ड वेबपोर्टलवर नावनोंदणी, नोकरी मिळविण्यासाठी सहाय्य, रोजगार मेळावे, अल्पमुदतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सेवा-सोसायटी नोंदणी, करिअर मार्गदर्शनासाठी अभ्यासिका, उद्योजकतेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आणि इनक्युबेशन सेंटर यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उपलब्ध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा उपयोग करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तहसील कार्यालय, पवनी येथे आयोजित या कार्यक्रमाला एकूण ३४ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या उपक्रमातून युवकांमध्ये कौशल्य विकास, रोजगार, प्रशिक्षण आणि उद्योजकतेविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत होत आहे.





  Print






Related Photos