महत्वाच्या बातम्या

 जनावरांसाठी चारा नियोजन करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन


- वैरण बियाणांची लागवड, चाऱ्याची साठवणूक व मुरघास निर्मितीवर भर

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : सन २०२६-२०२७ च्या पावसाळ्यात एल निनोच्या प्रभावामुळे राज्यासह भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पशुपालकांनी आतापासूनच चाऱ्याचे योग्य नियोजन करावे, तसेच वैरण बियाणांची जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. विलास गाडगे यांनी केले आहे.

सिंचनाची सुविधा असलेल्या इच्छुक पशुपालकांनी वैरण बियाणांच्या मागणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी यांच्याकडे सादर करावेत. पशुपालकांनी उपलब्ध चाऱ्याची योग्य पद्धतीने साठवणूक करून त्याची नासाडी टाळावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यावर भर -
तणीसासारख्या निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली युरिया प्रक्रिया करावी. तसेच हिरव्या चाऱ्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी मुरघास निर्मितीचे तंत्र अवलंबावे. यामुळे चारा टंचाईच्या काळात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देणे शक्य होईल. याशिवाय अ‍ॅझोला व हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जनावरांसाठी पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध करून घ्यावा. पीक काढणीनंतर शेतातील पिकांचे अवशेष जाळू नयेत. त्यांची योग्य प्रकारे साठवणूक करून चारा म्हणून उपयोग करावा, असेही पशुसंवर्धन विभागाने सूचित केले आहे.

चारा इतर कारणांसाठी विकू नये -
जिल्हाधिकारी, भंडारा यांच्या आदेशानुसार जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांनी त्यांच्याकडील उपलब्ध तणीस कोणत्याही उद्योगाला किंवा इतर वापरासाठी विकू नये, असे आवाहन डॉ. विलास गाडगे यांनी केले आहे. चारा नियोजन, वैरण बियाणांची लागवड तसेच चारा साठवणुकीबाबत अधिक माहितीसाठी पशुपालकांनी जिल्हास्तरीय किंवा संबंधित तालुकास्तरीय पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos