महत्वाच्या बातम्या

 ऑनलाइन नोकरीच्या जाळ्यात उच्चशिक्षित गृहिणी अडकली : ५.५७ लाखांची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
प्रतिनिधी / चंद्रपूर : घरबसल्या काम करून आर्थिक स्वावलंबी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका उच्चशिक्षित गृहिणीला ऑनलाइन नोकरीच्या आमिषातून सायबर भामट्यांनी ५ लाख ५७ हजार २११ रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. ऑनलाइन फॅशन उत्पादनांना रेटिंग देण्याच्या कामातून भरघोस कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून संबंधित महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. सुरुवातीला कमिशनच्या नावाखाली पैसे देऊन तिचा विश्वास जिंकण्यात आला; मात्र मोठी रक्कम गुंतवल्यानंतर पैसे काढण्यास अडथळे निर्माण करण्यात आले. विशेष म्हणजे, जमा केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी आणखी ४ लाख ९३ हजार २०६ रुपये भरण्याची मागणी करण्यात आल्याने फसवणुकीचा हा प्रकार समोर आला.

ऊर्जानगर येथील सीएसटीपीएस कॉलनीत राहणारी ३२ वर्षीय गृहिणी अभियांत्रिकी पदवीधर असून, घरून काम करता यावे यासाठी ऑनलाइन नोकरीच्या शोधात होती. तिने गुगल, लिंक्डइन आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर आपला बायोडाटा अपलोड केला होता. याचाच फायदा घेत २३ सप्टेंबर रोजी सारिका अग्रवाल नावाच्या महिलेने टेलिग्रामच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला. MODA OPERANDI या कंपनीत एजंट म्हणून काम करत असल्याचे सांगत कंपनीच्या उत्पादनांना ऑनलाइन रेटिंग दिल्यास चांगले कमिशन मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.

संबंधित महिलेने दिलेल्या लिंकवरून गृहिणीने आपले ऑनलाइन वर्किंग अकाउंट तयार केले. सुरुवातीला कंपनीच्या नावाने तिच्या अकाउंटमध्ये १० हजार रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर काम सुरू केल्यावर तिला १ हजार २२३ रुपये कमिशन मिळाले. पुढे कंपनीच्या कथित धोरणानुसार उत्पादनांची खरेदी केल्याचे दाखवून त्यांना रेटिंग देण्यासाठी स्वतःच्या खात्यातून पैसे भरण्यास सांगण्यात आले. तिने १० हजार रुपये भरल्यानंतर तिच्या खात्यात १७ हजार ५२६ रुपये कमिशन जमा झाले. त्यानंतरच्या व्यवहारांतून ३६ हजार १८९ रुपये कमिशन मिळाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. सुरुवातीला प्रत्यक्ष पैसे मिळाल्याने तिचा संबंधित कंपनी आणि एजंटवर विश्वास बसला.

यानंतर अधिक कमिशनचे आमिष दाखवत तिला वेगवेगळ्या बँक खात्यांवर आणि यूपीआय आयडीवर पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. २८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान तिने स्वतःच्या तसेच पतीच्या बँक खात्यांतून अनेक व्यवहार केले. या व्यवहारांत १० हजार, २५ हजार, ३० हजार आणि ५० हजार रुपयांसह मोठ्या रकमेचा समावेश होता. एका व्यवहारातून तब्बल २ लाख ९० हजार २३ रुपयेही दुसऱ्या बँक खात्यात पाठवण्यात आले. अशा प्रकारे तिने एकूण ५ लाख ५७ हजार २११ रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले.

गुंतवणुकीच्या बदल्यात कमिशनसह १२ लाख रुपये मिळणार असल्याचे तिला सांगण्यात आले होते. मात्र, पैसे काढण्याची वेळ येताच तिला रक्कम मिळाली नाही. सुरुवातीला संपर्क तोडण्यात आला. त्यानंतर सारिका अग्रवाल हिने पुन्हा संदेश पाठवून संपूर्ण पैसे मिळवण्यासाठी आणखी ४ लाख ९३ हजार २०६ रुपये भरावे लागतील, असे सांगितले. आधीच लाखो रुपये गुंतवूनही पैसे मिळत नसताना पुन्हा मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे गृहिणीच्या लक्षात आले.

या प्रकारानंतर महिलेने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवली. त्यानंतर चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. टेलिग्रामवरील सारिका अग्रवाल या आयडीसह Customer Service या ग्रुपच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे करीत आहेत.





  Print






Related Photos