गडचिरोली पोलिसांची सायबर गुन्हेगारांविरुद्ध मोठी कारवाई : दोन वेगवेगळ्या ऑनलाइन फसवणूक प्रकरणांतील तिघांना अटक


- म्युल बँक खात्यांद्वारे १ कोटी ४ लाखांहून अधिक रुपयांचे व्यवहार; बेडशीट विक्रीच्या बनावट जाहिराती देऊनही फसवणूक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सोशल मीडियावरील बनावट जाहिराती आणि इतरांच्या नावावरील बँक खात्यांचा वापर करून ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या सायबर फसवणूक प्रकरणांचा तपास करत पोलिसांनी एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. यापैकी एका प्रकरणात सात मुलींच्या नावाने उघडलेल्या सात बँक खात्यांमधून तब्बल १ कोटी ४ लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. तर दुसऱ्या प्रकरणात सोशल मीडियावर बेडशीट विक्रीच्या बनावट जाहिराती देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई केली. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.
मैत्रीचा विश्वास संपादन करून सात बँक खात्यांचा गैरवापर -
पहिल्या प्रकरणात आरोपी जुही विनायक मेश्राम (वय २३, रा. आशीर्वाद नगर, गडचिरोली) हिने मैत्रीचा विश्वास संपादन करून सात मुलींच्या नावाने बँक खाती उघडून घेतल्याचा आरोप आहे. या खात्यांचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आला असून, त्यातून १ कोटी ४ लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथे शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय युवतीची ४ जून २०२६ रोजी केदारनाथ येथे सहलीदरम्यान जुही मेश्राम या २२ वर्षीय युवतीशी ओळख झाली होती. पुढे दोघींची मैत्री झाली आणि फिर्यादीने जुहीची ओळख आपल्या अन्य सहा मैत्रिणींशी करून दिली.
दरम्यान, २० ऑगस्ट २०२६ रोजी जुहीने आपले बँक खाते होल्ड झाल्याचे सांगून ट्रेडिंग करण्यासाठी मैत्रिणींच्या नावाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते उघडून देण्याची विनंती केली. तिच्यावर विश्वास ठेवून सातही मुली तयार झाल्या. त्यानंतर जुहीने त्यांची वैयक्तिक कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने नवीन सिमकार्ड खरेदी केले. या सिमकार्डची संबंधित बँक खात्यांशी जोडणी करून घेतली. तसेच खात्यांची पासबुक, एटीएम कार्ड आणि सिमकार्ड स्वतःकडे ठेवून घेतल्याचा आरोप आहे.
६ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादीच्या घरी बँकेकडून तिच्या खात्यात मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याबाबत नोटीस आली. यानंतर सातही मुलींनी बँकेत जाऊन खात्यांची पडताळणी केली असता, त्यांच्या सात खात्यांमध्ये मिळून सुमारे १ कोटी ४ लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे उघड झाले. आपल्या परवानगीशिवाय खात्यांचा वापर करून विश्वासघात व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक १५१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(२) व ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
पुण्यातील मित्रासाठी उघडली खाती; दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत -
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान जुही विनायक मेश्राम हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पुणे येथे राहणारा तिचा मित्र सात्विक दीपक सावडिया (वय २२, रा. सुभाष चौक, रायगड, जि. रायगड, छत्तीसगड) याने ट्रेडिंगसाठी सात बँक खाती मिळवून देण्यास सांगितल्याची माहिती तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानुसार जुहीने गडचिरोलीतील सात मुलींना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्या नावाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या गडचिरोली शाखेत खाती उघडली. या खात्यांची पासबुक, एटीएम कार्ड, पिन आणि पासवर्ड तिने सात्विककडे दिल्याचे तपासात समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सात्विक सावडिया याचा शोध घेऊन १० ऑक्टोबर २०२६ रोजी त्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर जुही मेश्राम आणि सात्विक सावडिया या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या खात्यांमध्ये पैसे कोठून जमा झाले आणि पुढे कोणत्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले, याचा तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत.
बेडशीट विक्रीच्या बनावट जाहिराती; १,५५० रुपयांची फसवणूक -
दुसऱ्या प्रकरणात सोशल मीडियावर बेडशीट विक्रीच्या बनावट जाहिराती देऊन ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात राजस्थान राज्यातील साहिल जमशेद उर्फ साहिल जमशेद खान (वय २५, रा. सोमका, तहसील पहाडी, जिल्हा डीग, राजस्थान) याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.
तक्रारीनुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादीने फेसबुकवर Sajja Handloom या नावाने बेडशीट विक्रीची जाहिरात पाहिली. जाहिरात पाहून व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधत एका बेडशीटसाठी ५५० रुपये ऑनलाइन पाठविले. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी PP Collection AC Comfuter set Bedsheets या नावाने आणखी एक जाहिरात दिसल्याने फिर्यादीने तीन बेडशीटसाठी १,००० रुपये पाठविले.
अशा प्रकारे एकूण १,५५० रुपये भरूनही फिर्यादीला ऑर्डर केलेला माल मिळाला नाही. संबंधित दुकानाच्या मूळ मालकाशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या दुकानाच्या नावाचा वापर करून अज्ञात व्यक्ती ऑनलाइन फसवणूक करीत असल्याचे समोर आले.
या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(सी) व ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषणातून राजस्थानपर्यंत पोहोचले पोलीस -
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचे सखोल विश्लेषण केले. त्यातून आरोपी राजस्थान राज्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गडचिरोली पोलिसांचे पथक राजस्थान येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने १० ऑक्टोबर २०२६ रोजी साहिल जमशेद खान याला अटक करण्यात आली.
सक्षम न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवल्यानंतर आरोपीला १२ ऑक्टोबर २०२६ रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपीने अशाच प्रकारे आणखी किती नागरिकांची फसवणूक केली, फसवणुकीची रक्कम कोणत्या बँक खात्यांमध्ये जमा झाली, गुन्ह्यात वापरण्यात आलेली फेसबुक खाती, मोबाईल व सिमकार्ड तसेच या प्रकारात सहभागी असलेल्या इतर साथीदारांची माहिती मिळविण्यासाठी तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण बुंदे करीत आहेत.
सायबर सुरक्षा जनजागृती महिन्यात पोलिसांची कारवाई -
गडचिरोली पोलीस दलातर्फे १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान सायबर सुरक्षा जनजागृती महिना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, बनावट जाहिराती आणि सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. या जनजागृतीमुळे जागरूक झालेल्या नागरिकांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांची गांभीर्याने दखल घेत तपासाला गती दिली आणि आरोपींना अटक केली.
गडचिरोली पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर अतिशय कमी किमतीत वस्तू विक्रीच्या जाहिराती दिसल्यास त्यावर विश्वास ठेवून अनोळखी व्यक्तीच्या यूपीआय आयडी किंवा बँक खात्यावर पैसे पाठवू नयेत. ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी विक्रेत्याची विश्वासार्हता तपासून घ्यावी. तसेच ओळखीच्या व्यक्तीच्या सांगण्यावरूनही स्वतःच्या नावाने बँक खाते उघडून देऊ नये.
आपले बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक, सिमकार्ड, पिन, पासवर्ड किंवा वैयक्तिक कागदपत्रे इतरांच्या वापरासाठी देऊ नयेत. अशा खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी झाल्यास खातेधारकावरही कायदेशीर जबाबदारी येऊ शकते. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
दोन्ही प्रकरणांतील आर्थिक व्यवहारांचे मूळ, फसवणुकीची व्याप्ती आणि इतर संभाव्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.




Petrol Price




