अन्न सुरक्षा प्रशिक्षण उत्साहात संपन्न

- २७ प्रशिक्षणार्थींचा सहभाग; अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), भंडारा येथे FoSTaC (Food Safety Training & Certification) अंतर्गत एकदिवसीय अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रशिक्षणात २७ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. अन्न उत्पादक, अन्न प्रक्रिया उद्योजक, पॅकेजिंग व्यावसायिक तसेच अन्न उद्योगात नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना अन्न सुरक्षा मानके, स्वच्छता आणि गुणवत्ता व्यवस्थापन याबाबत व्यावहारिक माहिती मिळावी, हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
या प्रशिक्षणासाठी जबलपूर येथील विवेक पाठक यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन अश्विनी बुराडे यांनी केले. MCED नागपूर विभागाचे विभागीय अधिकारी हेमंत वाघमारे आणि MCED भंडारा येथील प्रकल्प अधिकारी शिवानी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
प्रशिक्षणादरम्यान अन्न सुरक्षा नियम, भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे (FSSAI) नियम व त्यांचे अनुपालन, अन्न हाताळणीतील स्वच्छता, पॅकेजिंग व वितरण व्यवस्थापन, अन्न उत्पादनाची गुणवत्ता नियंत्रित ठेवण्याच्या पद्धती, अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (FSMS), अन्न खराब होण्याची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील सुरक्षित कार्यपद्धती यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत केवळ चविष्ट उत्पादन तयार करणे पुरेसे नसून ते सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्न सुरक्षा नियमांचे योग्य पालन केल्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवणे, अन्न दूषित होण्याचा धोका कमी करणे आणि व्यवसायाची विश्वासार्हता वाढविणे शक्य होते.
बेकरी उद्योग, मसाला उत्पादन, लोणची व पापड निर्मिती, खाद्यपदार्थ प्रक्रिया, पॅकेज्ड फूड तसेच अन्न पॅकेजिंग व वितरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांसाठी असे प्रशिक्षण उपयुक्त ठरते. अन्न व्यवसायाशी संबंधित नियमांची माहिती घेऊन व्यवसायातील प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित करण्यासाठी प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत उद्योजकांमध्ये कौशल्यविकास, व्यवसायाभिमुख ज्ञान आणि उद्योजकीय क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येतात. अन्न प्रक्रिया उद्योगात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसह विद्यमान अन्न व्यावसायिकांनीही अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, भंडारा यांच्यावतीने करण्यात आले आहे. सुरक्षित अन्न, उत्कृष्ट गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हीच यशस्वी अन्न उद्योगाची खरी ओळख आहे.




Petrol Price




