महत्वाच्या बातम्या

 २२ वर्षांपासून फरार खुनी हल्ल्याचा आरोपी ब्रह्मपुरी पोलिसांच्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / ब्रह्मपुरी : पत्नीवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सन २००४ पासून फरार असलेल्या आरोपीला ब्रह्मपुरी पोलिसांनी तब्बल २२ वर्षांनंतर नागपूर जिल्ह्यातील नरसाळा येथून ताब्यात घेतले. रमेश झिंगूजी खानोरकर (रा. कुऱ्हा, ब्रह्मपुरी) असे आरोपीचे नाव असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो आपली ओळख लपवून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास होता. न्यायालयानेही त्याला फरार घोषित केले होते.

सन २००४ मध्ये ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३/२००४ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ आणि ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात रमेश खानोरकर याने आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. ब्रह्मपुरी पोलिसांकडून गेल्या २२ वर्षांपासून त्याचा सातत्याने शोध घेतला जात होता; मात्र तो मिळून येत नव्हता.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील नरसाळा परिसरात एक व्यक्ती अनेक वर्षांपासून एकटाच राहत असून, त्याच्याकडे कोणी नातेवाईक येत नसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला. संबंधित व्यक्तीची माहिती गोळा करून पडताळणी केली असता, तो २००४ मधील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी रमेश झिंगूजी खानोरकर असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या २२ वर्षांपासून तो आपले नाव आणि ओळख लपवून राहत असल्याचेही पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.

आरोपीला पोलिसांच्या हालचालींचा संशय येऊ नये, यासाठी त्याच्यावर गुप्तपणे लक्ष ठेवण्यात आले. गोपनीय बातमीदारांच्या मदतीने त्याच्या वास्तव्याची खात्री केल्यानंतर १३ ऑक्टोबर २०२६ रोजी ब्रह्मपुरी पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर तो राहत असलेल्या ठिकाणी अचानक छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने संबंधित गुन्ह्यातील आपला सहभाग मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे यांच्यासह पोलीस हवालदार मुकेश गजबे, मिलिंद नैताम तसेच पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, इर्शाद खान, निलेश तुमसरे, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ट रंगारी यांनी केले.





  Print






Related Photos