महत्वाच्या बातम्या

 दुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्रात विधीसेवा प्राधिकरणतर्फे विशेष शिबीर


- आसापूर ता. जिवती येथे आयोजन ; ३३८ जणांनी घेतला लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम व आदिवासी बहुल असलेल्या आसापूर (ता. जिवती) येथे महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर, डॉ. विश्व मानव रुहानी केंद्राचे बोगावार, महाराष्ट्र राज्य स्त्री रोग संघटनेच्या डॉ. मनिषा घाटे, डॉ. कल्पना गुलवाडे, विभागीय नियंत्रक अशोक वाडिभस्मे आदी उपस्थित होते. आसापूर व लगतच्या गावांतील नागरिकांना आरोग्यविषयक सोयीसुविधा, ज्या नागरिकांकडे आधारकार्ड तसेच शिधापत्रिका नाही, अशा नागरिकांना आधारकार्ड व शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या एकूण ३३८ नागरिकांनी सदर सुविधेचा लाभ घेतला.

विशेष म्हणजे या शिबिराच्या निमित्ताने आसापूर या दुर्गम व शासकीय सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या गावातील नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत राजुरा -आसापूर-जिवती या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गावातील दोन बोअरवेलची सुधारणा व दुरुस्ती करून त्या पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या. या उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांना वाहतूक व पाणीपुरवठ्यच्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा, कायदेविषयक मार्गदर्शन आणि मूलभूत सुविधांचा लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. विविध शासकीय विभाग, वैद्यकीय संस्था, सेवाभावी संस्था आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात विश्व मानव रूहानी केंद्र, नवान नगर (हरियाणा) या सेवाभावी संस्थेच्या चंद्रपूर शाखेच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. तसेच डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सा. कन्नमवार वैद्यकीय महाविद्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, पंडित दिनदयाल उपाध्याय कॅन्सर केअर सेंटर आणि चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी सोसायटी यांच्यासह इतर संस्थांनी व विभागांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी मोलाचे योगदान दिले.





  Print






Related Photos