गोवंश तस्करांना मकोकाचा दणका : डीवायएसपी चौगुले यांच्या नेतृत्वात कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गोवंश तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांविरुद्ध अवघ्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. घुग्घुस आणि रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून, अवैध गोवंश वाहतुकीच्या टोळ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.
घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६९/२०२६ अन्वये प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी ६५ गोवंशीय जनावरे, एमएच १८ बीजी ९४२५ क्रमांकाचा ट्रक आणि जुने वापरते मोबाईल असा एकूण २७ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
या गुन्ह्यात ओमप्रकाश मुरलीधर कावळे ३८ वर्ष, रा. यशोधरानगर, नागपूर, कलिम सईद मलिक ३३ वर्ष आणि शाहरुख मोहम्मद अयुब मलिक ३० वर्ष, दोघेही रा. उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली होती. तर इरफान शेख, तौसीफ अहमद आणि अरबाज कुरेशी हे आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांची लेखी परवानगी घेण्यात आली. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ मधील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास मकोक्यान्वये सुरू आहे.
रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गोवंश तस्करीच्या दुसऱ्या गुन्ह्यातही टोळीप्रमुख आणि सदस्यांविरुद्ध मकोक्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात इमरान उर्फ इमरान कुरेशी ३८ वर्ष, रा. गडचांदूर, सादिक उर्फ सादिक कुरेशी ३९ वर्ष, रा. गडचांदूर, वसीम सज्जाक कुरेशी ३३ वर्ष, रा. चंद्रपूर, सोहेल शेख अहमद २३ वर्ष, रा. तेलंगणा आणि नियामिद शेख उर्फ आवेश कुरेशी यांचा समावेश आहे. हे आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून जाणीवपूर्वक आपले अस्तित्व लपवून फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फरार आरोपींविरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील कारवाई सुरू आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात घुग्घुस येथील प्रकरणात पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले, पोलीस अंमलदार प्रसन्नजीत डोर्लीकर यांनी तर रामनगर येथील प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजेश चूंचूवार , पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील तसेच पोलीस हवालदार प्रतीक शेंडे, अमिल जमकातन, पपीता गिरसावळे, सपना साखरे आणि पोअं देविदास राठोड यांनी केले.




Petrol Price




