महत्वाच्या बातम्या

 जागतिक अंडी दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळांमध्ये ५,७०० अंड्यांचे वाटप


- मुलांच्या पोषणासाठी दररोज एक अंडे देण्याचे आवाहन; अंड्यांच्या पौष्टिकतेबाबत जनजागृती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जागतिक अंडी दिनानिमित्त जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ५ हजार ७०० अंड्यांचे वाटप करण्यात आले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना अंड्यांचे आहारातील महत्त्व पटवून देणे आणि संतुलित आहाराबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.  

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार जागतिक अंडी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पशुसंवर्धन विभागाच्या विविध संस्थाप्रमुखांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये अंडी वाटप करून अंड्यांच्या पोषणमूल्यांबाबत जनजागृती केली.

आरोग्य विभागाच्या बैठकीदरम्यान पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नाश्त्यासाठी अंडी व केळी यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अंडी हा पौष्टिक आहाराचा महत्त्वाचा स्रोत असल्याचे सांगितले. रुग्णांना अंड्यांच्या पोषणमूल्यांची माहिती देण्यासोबतच आरोग्य विभागानेही अंड्यांच्या आहारातील महत्त्वाबाबत व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मुलांच्या पोषणासाठी अंड्यांचा आहारात समावेश करण्याचे आवाहन केले. नाश्त्यामध्ये तळलेले व कमी पौष्टिक पदार्थ खाण्याऐवजी अंड्यांसारख्या पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्यावे. तसेच मुलांना मैद्यापासून तयार केलेली महागडी बिस्किटे, पेस्ट्री आणि चिप्स देण्याऐवजी त्यांच्या आहारात दररोज एका अंड्याचा समावेश करावा, असे त्यांनी सांगितले.

अंडे म्हणजे पोषणाचा खजिना -
अंडे हे सहज उपलब्ध होणारे आणि तुलनेने किफायतशीर प्रथिनांचा स्रोत आहे. एका अंड्यात साधारणतः ६ ते ७ ग्रॅम उच्च दर्जाचे प्रथिने असतात. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अमिनो आम्लांचा पुरवठा अंड्यातून होतो. त्यामुळे मुलांची शारीरिक वाढ, स्नायूंचा विकास आणि शरीराची दैनंदिन पोषणाची गरज पूर्ण करण्यासाठी अंडे उपयुक्त ठरते. अंड्यातील पिवळ्या बलकात असलेले कोलीन हे पोषकद्रव्य मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचे आहे. 

तसेच अंड्यात ल्यूटीन व झीअ‍ॅक्सॅन्थिन यांसारखे घटक असून ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. अंड्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराची विविध कार्ये सुरळीत ठेवण्यास मदत करतात. विशेषतः मुलांच्या वाढीच्या वयात संतुलित आहारासोबत अंड्यांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. गर्भवती महिला, वाढत्या वयातील मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आहारातही अंड्यांचा योग्य प्रमाणात समावेश करता येतो. अंड्यातील प्रथिने व इतर पोषक घटक शरीराची झीज भरून काढण्यास आणि स्नायूंचे आरोग्य टिकविण्यास मदत करतात.

मुलांच्या डब्यात अंड्याचा समावेश करा -
शाळेत जाणाऱ्या मुलांना दररोजच्या आहारातून पुरेसे पोषण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या डब्यात अंड्याचा समावेश करावा. अंडे पूर्णपणे शिजवून किंवा उकडून खाणे अधिक सुरक्षित असून, कच्चे अथवा अर्धवट शिजवलेले अंडे खाणे टाळावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.





  Print






Related Photos