महत्वाच्या बातम्या

 कर्तव्य बजावताना झालेल्या अपघातानंतर पोलीस हवालदाराचा मृत्यू : कुटुंबावर दुःखाचा डोंगर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : हायवे विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दिगंबर गुणाले ३७ वर्ष  यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातात त्यांच्या छातीला गंभीर अंतर्गत दुखापत झाली होती. त्यांच्या निधनामुळे शेणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी कर्तव्यावर असताना हायवे विभागाच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात दिगंबर गुणाले यांच्या छातीला अंतर्गत दुखापत झाली होती. त्यांच्यावर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज ते पुन्हा रुग्णालयात गेले असता त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

दिगंबर गुणाले हे दुर्गम जिवती तालुक्यातील शेणगाव येथील रहिवासी होते. अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या गुणाले यांनी पोलीस दलात सेवा बजावत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी दोन वेळा परीक्षा दिली; मात्र अवघ्या दोन-तीन गुणांनी त्यांना अपयश आले. परिस्थितीशी संघर्ष करत मोठे अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले.

कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेल्या दिगंबर गुणाले यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि सात व दहा वर्षांच्या दोन मुली असा परिवार आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या चिमुकल्या मुली आणि पतीच्या निधनाने दुःखात बुडालेल्या पत्नीच्या भविष्याचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. एका कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याच्या अकाली निधनाने पोलीस दलासह शेणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.






  Print






Related Photos