महत्वाच्या बातम्या

 विना परवानगी डीजे वाजविणाऱ्यांवर कारवाई : ९.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील गंज वॉर्ड परिसरात विना परवानगी डीजे वाजविणाऱ्या चालक व आयोजकांविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह डीजेचे साहित्य असा एकूण ९ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १२ ऑक्टोबर रोजी पहाटे करण्यात आली.

गंज वॉर्ड परिसरात विना परवानगी डीजे वाजविला जात असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी संबंधित चालक व आयोजकांविरुद्ध कारवाई केली. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १०२५/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम २२३, ३८ व १३६ नुसार १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २.२३ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.

या कारवाईत एमएच ३४ बीजी ०५१६ क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन आणि डीजेचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख ६६ हजार रुपये आहे.

चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी आवश्यक परवानग्या घेऊनच ध्वनिक्षेपक व डीजेचा वापर करावा आणि कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





  Print






Related Photos