राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदींचा हिशोब उपलब्ध

- १४ हजार ६९४ मतदारांचा हिशोब लागत नसल्याच्या वृत्तात तथ्य नाही; पुनरीक्षण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार सुरू असल्याचे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदींबाबत प्रशासनाकडे वर्गवारीनिहाय माहिती व आवश्यक अभिलेख उपलब्ध असून, १४ हजार ६९४ मतदारांचा हिशोब लागत नसल्याच्या वृत्तात तथ्य नाही, असे स्पष्टीकरण मतदार नोंदणी अधिकारी तथा राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांनी दिले आहे. मतदार नोंदणी आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६) प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पारदर्शकपणे व नियमानुसार राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची पडताळणी, ईएफ (Enumeration Form) फॉर्मचे संकलन व डिजिटायझेशन, संशयास्पद मतदार नोंदणी अर्जांची छाननी तसेच मतदार यादीतील विसंगत नोंदींची सुनावणी अशा विविध टप्प्यांवर प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. ईएफ फॉर्म प्राप्त न झालेल्या मतदारांची स्वतंत्र पडताळणी करून त्यांच्या नोंदींचे वर्गवारीनिहाय अभिलेख तयार करण्यात आल्याने मतदारांच्या नोंदींबाबत संभ्रम निर्माण करण्याची गरज नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
३ लाख १० हजार ५८४ मतदारांसाठी ईएफ फॉर्मचे वितरण -
राजुरा विधानसभा मतदारसंघात १८ जून २०२६ रोजी उपलब्ध नोंदीनुसार एकूण ३ लाख १० हजार ५८४ मतदार होते. या सर्व मतदारांसाठी ईएफ फॉर्म छापून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) वितरित करण्यात आले. त्यापैकी २ लाख ७२ हजार ८४६ मतदारांचे भरलेले व स्वाक्षरी केलेले फॉर्म प्राप्त झाले असून, त्यांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे.
उर्वरित ३७ हजार ७३८ मतदारांचे ईएफ फॉर्म प्राप्त न झाल्याने संबंधित बीएलओमार्फत त्यांची स्वतंत्र पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत संबंधित मतदारांची स्थिती आणि फॉर्म प्राप्त न होण्याची कारणे तपासून वर्गवारीनुसार माहिती संकलित करण्यात आली.
उपलब्ध आकडेवारीनुसार, २० हजार ६६६ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. ९ हजार १२९ मतदार मृत असल्याची नोंद आहे. ३ हजार ३५२ मतदार संबंधित पत्त्यावर आढळून आले नाहीत किंवा अनुपस्थित होते. ३ हजार ८१७ मतदारांची अन्यत्र आधीच नोंदणी झालेली आहे, तर उर्वरित ७७४ मतदारांची नोंद इतर कारणांमुळे संबंधित वर्गवारीत करण्यात आली आहे.
या सर्व नोंदींचे वर्गीकरण करून त्याबाबतची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे ईएफ फॉर्म प्राप्त न झालेल्या मतदारांचा तपशील प्रशासनाकडे उपलब्ध असून, मतदार यादी पुनरीक्षणाची कार्यवाही निर्धारित प्रक्रियेनुसार सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांनी स्पष्ट केले.
संशयास्पद मतदार नोंदणी अर्जांवर कारवाई -
राजुरा विधानसभा मतदारसंघात ईआरओ नेट (ERO NET) या ऑनलाइन प्रणालीद्वारे बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणीसाठी ७ हजार ४६५ संशयास्पद अर्ज सादर करण्यात आले होते. या अर्जांची संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान अर्जदारांनी दिलेल्या पत्त्यावर ते आढळून न येणे, अर्जदाराचे अस्तित्व आढळून न येणे, छायाचित्रे आणि आवश्यक पुरावे उपलब्ध नसणे आदी बाबी निदर्शनास आल्या. या कारणांमुळे एकूण ७ हजार ४६५ संशयास्पद अर्जांपैकी ६ हजार ८५३ अर्ज नियमानुसार नामंजूर करण्यात आले. या प्रकरणी तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांच्या तक्रारीवरून १९ ऑक्टोबर २०२४ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ०६२९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
राजकीय पक्षांना पुनरीक्षण प्रक्रियेची माहिती -
विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याच्या दृष्टीने नोंदणीकृत राजकीय पक्षांना वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे. यासाठी ११ मे, ६ जुलै, ११ जुलै, २९ जुलै, १० ऑगस्ट, १३ ऑगस्ट आणि २१ सप्टेंबर २०२६ रोजी राजुरा उपविभागीय कार्यालयात बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.
या बैठकांमध्ये मतदार पडताळणी, ईएफ फॉर्मचे संकलन आणि पुनरीक्षण प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत माहिती देण्यात आली. तसेच ईएफ फॉर्म प्राप्त न झालेल्या ३७ हजार ७३८ मतदारांची यादी नोंदणीकृत राजकीय पक्षांना पेनड्राइव्हद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांच्या नोंदींबाबतची माहिती संबंधित राजकीय पक्षांनाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रारूप मतदार यादीत २ लाख ७२ हजार ८४६ मतदार -
राजुरा विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत २ लाख ७२ हजार ८४६ मतदारांचा समावेश आहे. नागरिकांना यादीची पाहणी करता यावी, यासाठी ती संबंधित मतदान केंद्रे, तहसील कार्यालये, पंचायत समिती कार्यालये आणि नगर परिषद कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली.
प्रारूप मतदार यादीच्या पडताळणीदरम्यान लॉजिकल डिस्क्रिपन्सी (Logical Discrepancy) आणि नो मॅपिंग (No Mapping) या प्रकारांतील एकूण ९ हजार ९ नोंदींची अधिक पडताळणी आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. या नोंदींमधील विसंगती दूर करण्यासाठी संबंधित मतदारांची सुनावणी व कागदपत्रांची तपासणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
२५ सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती -
विसंगत नोंदींच्या सुनावणी व पडताळणीसाठी २५ सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित चारही तालुक्यांमध्ये सुनावणीची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अंदाजे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. सुनावणीदरम्यान मतदारांकडून प्राप्त होणारी आवश्यक कागदपत्रे बीएलओ ॲपवर अपलोड करण्यात येत आहेत.
या प्रक्रियेद्वारे मतदारांच्या नोंदींची अचूकता तपासणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आणि आढळलेल्या विसंगतींचे निराकरण करणे यावर भर दिला जात आहे. उर्वरित कामकाजही विहित प्रक्रियेनुसार पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
१६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणारन -
राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेतील उर्वरित कामकाज निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे.
मतदारांच्या नोंदींची पडताळणी, ईएफ फॉर्मचे डिजिटायझेशन, संशयास्पद अर्जांवरील कारवाई आणि विसंगत नोंदींच्या सुनावणीची कार्यवाही निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सुरू आहे. ईएफ फॉर्म प्राप्त न झालेल्या मतदारांची वर्गवारीनिहाय माहिती आणि संबंधित अभिलेख प्रशासनाकडे उपलब्ध असल्याने १४ हजार ६९४ मतदारांचा हिशोब लागत नसल्याच्या वृत्तात तथ्य नाही, असा पुनरुच्चार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांनी केला आहे.




Petrol Price




