एमबीबीएस प्रवेशाचे स्वप्न दाखवून पालकांची ८.९८ लाखांची फसवणूक : मुलांच्या भविष्याची चिंता करताना बसला आर्थिक फटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मुलांनी डॉक्टर व्हावे, त्यांच्या गळ्यात स्टेथोस्कोप पडावा आणि त्यांनी आयुष्यात मोठे यश मिळवावे, या स्वप्नासाठी पालक रात्रंदिवस कष्ट करतात. मुलांच्या शिक्षणासाठी पै-पै जमवून भविष्याची तरतूद करतात. मात्र, याच स्वप्नांचा आधार घेत एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून चंद्रपुरातील एका औषध व्यावसायिकासह त्यांच्या मित्राची ८ लाख ९८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चंद्रपुरातील तुकूम परिसरात राहणारे मंगेश भोंबे हे औषध एजन्सीचा व्यवसाय करतात. त्यांच्या मित्राची गुगलवर ऑनलाइन शोध घेतल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशन करणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली. संबंधित व्यक्तीने आपल्या ओळखीच्या माध्यमातून एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांना कमी खर्चात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून दोन्ही कुटुंबांनी मुलांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले.
७ सप्टेंबर २०२५ रोजी मंगेश भोंबे आणि त्यांचे मित्र प्रवेशाच्या कामासाठी उदयपूरला रवाना झाले. दुसऱ्या दिवशी तेथे पोहोचल्यानंतर संबंधित व्यक्ती भेटली नाही. फोनवरून संपर्क साधल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रशासनाशी बोलणी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एका दंत महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या नावाखाली एक लाख रुपये ऑनलाइन जमा करण्यात आले. मात्र, प्रवेश न मिळाल्याने ही रक्कम नंतर परत करण्यात आली.
यानंतर संबंधित व्यक्तीने सांगली येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. प्रवेशासाठी महाविद्यालयाचे शुल्क आणि प्रवेश निश्चित करण्यासाठी अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल, असे सांगण्यात आले. मुलांचे प्रवेश निश्चित होतील, या आशेने पालकांनी पैसे देण्यास सुरुवात केली.
८ नोव्हेंबर २०२५ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत विविध टप्प्यांत ऑनलाइन व्यवहार करण्यात आले. मंगेश भोंबे यांच्या बँक खात्यातून तसेच त्यांच्या भावाच्या खात्यातून पैसे पाठविण्यात आले. त्यांच्या मित्रानेही संबंधित व्यक्तीने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ऑनलाइन रक्कम जमा केली. अशा प्रकारे तिघांच्या बँक खात्यांतून एकूण ८ लाख ९८ हजार रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मुलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल आणि त्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला बळ मिळेल, या अपेक्षेने पालकांनी संबंधित व्यक्तीवर विश्वास ठेवला. मात्र, प्रवेशाच्या आश्वासनापोटी पैसे दिल्यानंतरही अपेक्षित काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी जमवलेली रक्कम गमावल्याने पालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
गुगलवर ऑनलाइन संपर्क साधून वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मंगेश भोंबे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके करीत आहेत.




Petrol Price




