महत्वाच्या बातम्या

 बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिधातू कलशाचे दर्शन घेण्याची संधी : दीक्षाभूमीवर उद्यापासून ७० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देणारा ७० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ उद्या, १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी आणि दीक्षाभूमी विहार विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा सोहळा धम्माची समृद्धी, मानवी कल्याण आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा ठरणार आहे. या सोहळ्याचे सर्वांत भावस्पर्शी आकर्षण म्हणजे बाबासाहेबांचा पवित्र अस्थिधातू कलश नागरिकांना दर्शनासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. बाबासाहेबांच्या अस्थिधातू कलशाचे दर्शन घेण्याची ही संधी अनुयायांसाठी श्रद्धा, अभिमान आणि भावनेचा अनमोल क्षण ठरणार आहे.

१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीने दीक्षाभूमीकडे प्रस्थान करण्यात येईल. सायंकाळी ४.३० वाजता मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रद्धेय भदन्त ज्ञानज्योती महास्थविर, संघारामगिरी यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण होईल. यावेळी स्वागताध्यक्ष मारोतराव खोबरागडे यांच्यासह जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आणि मनपा आयुक्त अकनुरी नरेश विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सामूहिक बुद्धवंदना आणि स्फूर्तिगीतांनंतर सायंकाळी ५.१० वाजता धम्मप्रवचन होणार असून, श्रद्धेय भदन्त ज्ञानज्योती महास्थविर उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील.

रात्री ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनातील स्त्रियांचे योगदान या विषयावर परिसंवाद होणार आहे. कवयित्री रजिया सुलताना अध्यक्षस्थानी राहतील, तर डॉ. सुनीता सावरकर आणि शारदा नवले मार्गदर्शन करतील. बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात महिलांनी दिलेल्या योगदानाला उजाळा देणारा हा परिसंवाद विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

१६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून त्यांच्या पवित्र अस्थिधातू कलशाची मिरवणूक काढण्यात येईल. भिक्षुसंघ आणि समता सैनिक दलाच्या पथसंचलनासह ही मिरवणूक दीक्षाभूमीकडे रवाना होईल. बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या वेळी अनुयायांची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सकाळी ११ वाजता प्रा. रवी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘त्रिरत्न, धम्मक्रांती आणि भारतीय संविधान’ या विषयावर परिसंवाद होईल. यात भदन्त डॉ. चावला आणि डॉ. आनंद भालेराव विचार मांडतील.

दुपारी १.३० वाजता धम्मसेनानायक भदन्त आर्य यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक बुद्धवंदना आणि धम्मप्रवचन होईल. सायंकाळी ५ वाजता मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समारंभ पार पडेल. दिल्लीचे भदन्त दीपांकर सुमेधो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. नारायण कांबळे, डॉ. जगदीश ओहळ आणि धम्मप्रकाश बौद्ध विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. रात्री ९ वाजता मुंबईचे शाहीर राजेश शिर्के आणि शाहिरा दिशा शिर्के संचातर्फे बुद्ध-भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल.

बाबासाहेबांनी दिलेला समतेचा आणि मानवतेचा विचार आजही लाखो लोकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभातून सामाजिक न्याय, बंधुता आणि करुणेचा संदेश पुन्हा एकदा जनमानसात रुजणार आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिधातू कलशाचे दर्शन, बुद्धवंदना, धम्मप्रवचन आणि वैचारिक परिसंवाद यांच्या माध्यमातून ऐतिहासिक दीक्षाभूमीवर श्रद्धा आणि परिवर्तनाच्या विचारांचा संगम अनुभवायला मिळणार आहे.





  Print






Related Photos