गडचिरोलीत जागर आरोग्याचा – मुख्यमंत्री आरोग्य संवाद उपक्रमाचे उद्घाटन


- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य व निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या जागर आरोग्याचा–मुख्यमंत्री आरोग्य संवाद उपक्रमाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली येथे करण्यात आले. यानिमित्त व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध, निरोगी जीवनशैली आणि युवा शक्ती या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहम्मद फैजल, नोडल अधिकारी डॉ. निर्मल चन्ने, जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर मडावी, तसेच डॉ. मंगेश हनुमंते, हर्षल पाटेकर, डॉ. ललित मेश्राम, डॉ. हेमलता अंबादे आणि डॉ. शशिकांत ढोबळे उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. अश्विनी डोंगरे आणि डॉ. शिकांत बांबोळे यांनी विविध आरोग्यविषयक मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य या विषयांसोबतच आत्महत्या प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडित या विषयांची माहिती देत आरोग्याबाबत सजग दृष्टिकोन विकसित करण्यावर कार्यक्रमात भर देण्यात आला.
निरोगी जीवनशैली आणि युवा शक्ती या विषयांवरही यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. युवकांच्या सहभागातून आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने हा संवाद आयोजित करण्यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्याशी संबंधित विषय एकत्रितपणे मांडण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आरोग्याच्या विविध पैलूंची माहिती मिळाली. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी आरोग्य शपथ घेतली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून जागर आरोग्याचा–मुख्यमंत्री आरोग्य संवाद उपक्रमांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.




Petrol Price




