महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात एलसीबीचा तंबाखू तस्करांवर छापा : दोघे ताब्यात, १.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), चंद्रपूरने धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत तेलंगणा राज्यातून विनापरवाना आणलेला १ लाख २३ हजार ३७५ रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. या कारवाईमुळे अवैध तंबाखू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

१३ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान साहिल मंगल वांढे २४ वर्ष रा. बिनबागेट वार्ड, चंद्रपूर आणि वसंत नागोजी नरड ६० वर्ष रा. हनुमान वार्ड, चंद्रपूर या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून तेलंगणा राज्यातून विनापरवाना आणलेला हुक्का शिशा, ईगल हुक्का शिशा आदी प्रतिबंधित सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हिरो मोटारसायकल क्रमांक एमएच ३४ एआर ९९०९ देखील पोलिसांनी जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या तंबाखूसह मोटारसायकलची एकूण किंमत १ लाख २३ हजार ३७५ रुपये आहे.

या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित तंबाखूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अशा गैरप्रकारांत सहभागी असणाऱ्यांना चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर उपविभाग पथकाने केली.





  Print






Related Photos