जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राबविणार व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम


- विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून प्रबोधन; उत्कृष्ट शाळांचा होणार गौरव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत त्यांच्यामध्ये आरोग्यदायी जीवनशैलीची गोडी निर्माण करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार असून, प्रबोधनात्मक सत्रे, विविध स्पर्धा, समुपदेशन आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला जाणार आहे. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांचा गौरव प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री व तस्करी रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय एनकॉर्ड (NCORD) उपसमितीची बैठक नगर परिषद येथे आयोजित करण्यात आली होती.बैठकीला नगर परिषद प्रशासनाचे आयुक्त चंदन पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, व्यसनमुक्ती केंद्राचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांसाठी नियमित प्रबोधनात्मक सत्रे -
इयत्ता आठवी, नववी, दहावी आणि त्यापुढील वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये नियोजनानुसार प्रबोधनात्मक सत्रे आयोजित करण्यावर भर देण्यात येणार आहे. या सत्रांमध्ये व्यसनांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम, व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैली याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल.विद्यार्थ्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी पोस्टर, बॅनर, निबंध स्पर्धा, एकांकिका, लघुनाट्य, भूमिका अभिनय रिल्स यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश विद्यार्थी, कुटुंबे आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पालकांच्या समुपदेशनावरही भर -
व्यसनमुक्तीच्या जनजागृतीत पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांच्यासाठीही समुपदेशनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुलांच्या वर्तनातील बदल ओळखणे, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे आणि व्यसनांपासून दूर राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे, याबाबत पालकांना माहिती दिली जाईल. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय वाढवून व्यापक स्वरूप देण्याचे उद्दिष्ट आहे.
सोशल मीडिया, रील्स आणि व्हिडिओंच्या माध्यमातून जनजागृती -
डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून तरुणाईपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे नियोजन आहे. यासाठी इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जनजागृतीपर रील्स, लघु व्हिडिओ आणि आकर्षक माहितीपूर्ण साहित्य प्रसारित करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट शाळांचा होणार गौरव -
व्यसनमुक्ती जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांचे मूल्यमापन करून जिल्हा प्रशासनाच्या हस्ते उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षित भविष्य आणि व्यसनमुक्त समाजनिर्मिती या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शाळा, महाविद्यालये, पालक, शिक्षक आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.




Petrol Price




