सिरोंचा वन विभाग मध्ये वनजमिनीवर बेकायदेशीर प्लांटची उभारणी : ए. सी. शेख कन्स्ट्रक्शनवर फौजदारी कारवाईची मागणी


- संबंधित वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून निलंबनाची कारवाई करा; संतोष ताटीकोंडावार यांचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा वनविभागांतर्गत येणाऱ्या बामणी वनपरिक्षेत्रातील वनजमिनीवर कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता रस्ते बांधकामासाठी लागणारा प्लांट व यंत्रसामग्री उभारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद येथील ए. सी. शेख कन्स्ट्रक्शन कंपनी ने केलेल्या या कथित अनधिकृत बांधकामावर आणि वनजमिनीच्या व्यावसायिक वापरावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.
यासंदर्भात संतोष ताटीकोंडावार यांनी सिरोंचा येथील उपवनसंरक्षकांकडे ६ मे रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, संबंधित कंत्राटदाराने वनकायद्यांचे थेट उल्लंघन करून मौल्यवान वनजमिनीचा व्यावसायिक कामांसाठी ताबा घेतला आहे. यामुळे परिसरातील पर्यावरणाची मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वनजमिनीचा असा अनधिकृत वापर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर तात्काळ फौजदारी (गुन्हेगारी) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांचे संगनमत? चौकशी व निलंबनाची मागणी -
एवढ्या मोठ्या प्रमाणावर वनजमिनीवर यंत्रसामग्री आणि प्लांट उभा राहत असताना स्थानिक वन प्रशासनाला याची कल्पना कशी नाही, असा संशय तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणात बामणी वनपरिक्षेत्राचे संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO), वनपाल आणि वनरक्षक यांच्या संशयास्पद भूमिकेची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी व्हावी. कर्तव्यात कसूर करणे किंवा कंत्राटदाराशी संगनमत असणे स्पष्ट झाल्यास, दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर कठोर विभागीय कारवाई करावी, असेही ताटीकोंडावार यांनी नमूद केले आहे.
शासकीय नुकसानीची वसुली करा.
वनजमिनीवरील हा अनधिकृत ताबा आणि वापर वनविभागाने तत्काळ थांबवावा, उभारलेली यंत्रसामग्री सील करावी तसेच वनजमिनीच्या झालेल्या नुकसानाची कंत्राटदाराकडून वसुली करावी, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे. वनविभागाने वेळेत दखल न घेतल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.




Petrol Price




