चंद्रपूर जिल्ह्यातील ३४१० शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची तिसरी यादी प्राप्त


- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
- पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ३४१० पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची तिसरी यादी प्राप्त झाली आहे. यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३१२ तर राष्ट्रीयकृत बँकेच्या ३०९८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
राज्य शासनाने राज्यातील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली असून, यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ३४१० शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी महाआयटीमार्फत ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. राज्यातील विविध बँकांनी एकूण ३१ लाख १७ हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यानुसार २४ जुलै २०२६ रोजी राज्यातील १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी, ११ सप्टेंबर २०२६ रोजी ४ लाख २० हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी आणि १२ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बँक शाखा व ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध होणार यादी : चंद्रपूर जिल्ह्यातील तिसऱ्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या ३४१० शेतकऱ्यांची नावे संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित ठिकाणी आपले नाव तपासून ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करावी. त्यानंतर नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.
या यादीतील पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या हेअरकट धोरणानुसार संबंधित कर्ज खाती निरंक करण्यात येणार आहेत.
आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन : पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तिसऱ्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व ३४१० शेतकऱ्यांनी आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी कळविले आहे.




Petrol Price




