महत्वाच्या बातम्या

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित


- १२ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या वर्षांसाठीच्या विविध क्रीडा पुरस्कारांकरिता पात्र खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक आणि संबंधित व्यक्तींकडून ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.

क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे आणि गुणवंत खेळाडूंना राज्यस्तरावर सन्मानित करणे, हा या पुरस्कारांचा उद्देश आहे. त्यानुसार विविध प्रवर्गांतील पुरस्कारांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विविध प्रवर्गांतील पुरस्कारांसाठी अर्ज मागविले -
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडामहर्षींना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांना जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच उत्कृष्ट खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व व्यक्तींना संबंधित पुरस्कारांनी गौरविण्यात येते. या पुरस्कारांमुळे क्रीडा क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेतली जाते. तसेच नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळून राज्याच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होते.

सुधारित नियमावलीनुसार अर्ज प्रक्रिया -
महाराष्ट्र शासनाने २९ डिसेंबर २०२३ आणि २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयांनुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची सुधारित नियमावली २०२३ निश्चित केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या पुरस्कार वर्षांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व व्यक्तींनी विहित कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

१५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत -
पुरस्कारासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटे ५९ सेकंदांपर्यंत आहे. अर्जदारांनी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

अधिकृत संकेतस्थळ : https://sports.maharashtra.gov.in -
अर्ज सादर करताना संबंधित उमेदवारांनी सुधारित नियमावलीतील पात्रतेचे निकष आणि अर्जासंदर्भातील सूचनांची माहिती घेऊन निर्धारित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा -
गडचिरोली जिल्ह्यातील पात्र खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनी या पुरस्कारांसाठी जास्तीत जास्त संख्येने प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांना राज्य स्तरावर सन्मान मिळविण्याची ही संधी असून, पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos