हाजराफॉल गेटसमोर दुचाकीची खांबाला धडक : २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : भरधाव वेगात मोटारसायकल चालविताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या खांबाला जोरात धडकली. या भीषण अपघातात मोटारसायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हाजराफॉल गेटसमोर शुक्रवारी (दि. ९) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. ओमप्रकाश बुधराम माहोरे (वय २२, रा. पानगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
डोंगरगडहून पानगावकडे जाताना अपघात -
मिळालेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश माहोरे हा मोटारसायकलने डोंगरगड येथून पानगावकडे जात होता. दरम्यान, हाजराफॉल गेटसमोर पोहोचला असता त्याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या खांबाला जोरात धडकली. या धडकेत ओमप्रकाश गंभीर जखमी झाला. अपघातातील गंभीर दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पानगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल -
या अपघातप्रकरणी लखी बसंत शहारे १८ वर्षे रा. पानगाव, ता. सालेकसा) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), २८१ आणि १२५ (ब) अन्वये या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार विनोद वैद्य करीत आहेत.




Petrol Price




