धानोऱ्यात सेवा संकल्प अभियानात जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग


- विविध सेवांचे वितरण; वनहक्क दाव्यांबाबत मार्गदर्शन, महामार्गाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : सेवा संकल्प अभियानांतर्गत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी धानोरा तालुक्यातील विविध उपक्रमांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय सेवांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी वैयक्तिक वनहक्क दावे, डिजिटल पीक पाहणी, धानोरा-मुरूमगाव राष्ट्रीय महामार्ग तसेच एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामाचा प्रत्यक्ष आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
मौजे पन्नेमारा येथे वैयक्तिक वनहक्क दावे सादर करण्यासाठी आयोजित शिबिरात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपस्थित नागरिक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वनहक्क दाव्यांशी संबंधित प्रकरणे योग्य पुराव्यांसह सादर करून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल व वन विभागाने समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
ज्या शेतकऱ्यांच्या वनहक्क दाव्यांच्या प्रकरणांमध्ये अतिक्रमणासंदर्भातील पुरावे उपलब्ध नाहीत, अशा प्रकरणांमध्ये पंचनामे, गावातील ज्येष्ठ नागरिकांची प्रतिज्ञापत्रे तसेच गुगल इमेज यांच्या आधारे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पात्र दाव्यांची कार्यवाही करण्यास गती मिळणार आहे.
येरकड येथे डिजिटल पीक पाहणी -
मौजे येरकड येथे शेतकरी तेजनाथ शिंपी यांच्या शेतात जिल्हाधिकारी पंडा यांनी डिजिटल पीक पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली. तसेच शेतकऱ्याशी संवाद साधून पीक नोंदणीची प्रक्रिया, पिकांची सद्यस्थिती आणि डिजिटल पीक पाहणीबाबत माहिती घेतली.
शेतकऱ्यांच्या पीकविषयक नोंदी अचूक पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी डिजिटल पीक पाहणी महत्त्वाची असल्याने संबंधित यंत्रणेने शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
धानोरा-मुरूमगाव महामार्गाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश -
धानोरा-मुरूमगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मौजे ढवळी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेतली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली.
महामार्गाचे काम प्रलंबित राहू नये आणि नागरिकांना वाहतुकीची सुविधा लवकर उपलब्ध व्हावी, यासाठी काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता केळकर यांना दिले.
एकलव्य निवासी शाळेचे बांधकाम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश -
धानोरा येथील एकलव्य निवासी शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचीही जिल्हाधिकारी पंडा यांनी पाहणी केली. बांधकामाची सद्यस्थिती व सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शाळेच्या इमारतीचे बांधकाम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक -
दौऱ्यादरम्यान तहसील कार्यालय, धानोरा येथे तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील विविध समस्या, प्रलंबित कामे तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी पंडा यांनी संबंधित कार्यालय प्रमुखांकडून त्यांच्या विभागातील कामकाजाची माहिती घेतली. नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविण्यासोबतच शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुण एम, सहायक जिल्हाधिकारी डॉ. अजय डोके, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, तहसीलदार गणेश माळी तसेच तालुकास्तरीय यंत्रणेतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




Petrol Price




