माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य व अग्निशस्त्रे गडचिरोली पोलीस दलाने केले जप्त


- स्फोटक साहित्यासह एकूण ०६ अग्निशस्त्रे जप्त
- अभियानादरम्यान विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील माओवाद आता संपूष्टात आला असून, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ देखील जवळजवळ संपूष्टात आली आहे. सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे. आंतरराज्यीय सिमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हेे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये लपवून ठेवले जात असे.
त्याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करुन आणण्यास केला जात होता. या विरोधात काल ०६ ऑक्टोंबर २०२६ रोजी प्रभावी कारवाई करत माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलातील जवानांना यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे माओवाद्यांनी महाराष्ट्र छत्तीसगड सिमेवरील कोपर्शी जंगल परिसरात मोठ प्रमाणावर अग्निशस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाल्याने ०६ ऑक्टोंबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथक प्राणहिता येथील ०५ तुकड्या, बिडीडीएसचे ०२ पथक शोध अभियान राबविणे कामी रवाना करण्यात आले होते.
काल ०६ ऑक्टोंबर २०२६ रोजी सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथकांकडून घेरा घालुन बिडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता सदर ठिकाणा वरुन 1) ०१ नग ३०३ रायफल, 2) ०२ नग सिंगल शॉट रायफल, 3) ०२ नग गावठी पिस्टल, 4) ०१ नग बिजीएल लॉन्चर, 5) १० नग बिजीएल सेल, 6) २१ नग जिवंत काडतुस, 7) ०७ नग डेटोनेटर, 8) १५० मीटर केबल वायर, 9) ०२ नग मॅगझिन, 10) ०२ नग कुकर, 11) ०३ नग वॉकीटॉकी, 12) ०३ नग वॉकीटॉकी चार्जर, 13) ०२ नग वॉकीटॉकी बॅटरी, इ. असे माओवादी साहित्य घटनास्थळावरुन हस्तगत करण्यात आले असून इतर माओवादी साहित्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावर नष्ट करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शना खाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी.अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बि. जे. पोलीस उप-अधीक्षक (अभियान) सुनिल उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता व इंट सेल तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.




Petrol Price




