सायबर गुन्हेगारांवर गडचिरोली पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक : ३ आरोपी गजाआड, १ कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा उघड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सायबर गुन्हेगारांविरुद्ध गडचिरोली पोलीस दलाने धडक कारवाई सत्र सुरू केले असून दोन वेगवेगळ्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणात ३ आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे. यात म्युल अकाऊंटच्या माध्यमातून तब्बल ०१ कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक करणाऱ्या दोन्ही आरोपींना आणि सोशल मीडियावर बनावट जाहिराती देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढून त्याला अटक करण्यात आली आहे.
गडचिरोली येथे शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय युवतीची ०४ जून २०२६ रोजी केदारनाथ येथील सहलीदरम्यान गडचिरोली येथील एका २२ वर्षीय युवतीशी ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री होऊन फिर्यादीने तिची ओळख आपल्या सहा मैत्रिणींशी करून दिली. २० ऑगस्ट २०२६ रोजी सदर युवतीने आपले बँक खाते होल्ड झाल्याचे सांगून ट्रेडिंग करण्याकरिता सर्व मैत्रिणींच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते उघडून देण्याची विनंती केली. विश्वास ठेवून मैत्रिणी तयार झाल्यानंतर ऑगस्ट २०२६ मध्ये तिने त्यांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावे नवीन सिमकार्ड खरेदी केले, त्यांच्या नावे बँक खाती उघडून तिने सिमकार्ड खात्यांशी लिंक केले आणि खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड व सिमकार्ड स्वतःसोबत घेऊन गेली.
यानंतर ०६ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादीच्या घरी बँकेकडून तिच्या खात्यात मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याबाबतची नोटीस आली. सर्व मैत्रिणींनी बँकेत जाऊन खात्यांची पडताळणी केली असता, सातही खात्यांमध्ये मिळून सुमारे ०१ कोटी ०४ लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. आपल्या परवानगीशिवाय खात्यांचा वापर करून विश्वासघात व फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीने ०९ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अप क्र. १५१३/२०२६ कलम ३१६ (२), ३१८ (४) भा.न्या.सं. २०२३ अन्वये सदर युवतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवून आरोपी जुही विनायक मेश्राम, २३ वर्षे, रा. आशिर्वाद नगर, गडचिरोली हिस मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन तिच्याकडे सदरबाबत अधिक विचारपूस केली असता, पुणे येथील तिचा मित्र नामे सात्विक दीपक सावडिया, २२ वर्षे, रा. सुभाष चौक, रायगड, जि. रायगड (छ.ग.) याने तिला ट्रेडिंगकरिता सात बँक खाती मिळविण्यास सांगितले असता तिने गडचिरोली येथील ०७ मुलींना खोटे सांगून महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गडचिरोली येथे खाते काढून सदर सातही बँकेचे पासबुक, एटीएम, पिन, पासवर्ड हे आरोपी मित्र सात्विक यास दिल्याचे सांगितले.
यानंतर सदर माहितीच्या आधारे शोध घेऊन सात्विक सावडिया यास पोलिसांनी १० ऑक्टोबर २०२६ रोजी ताब्यात घेतले. यानंतर आरोपी क्र. १) जुही विनायक मेश्राम, २३ वर्षे, रा. आशिर्वाद नगर, गडचिरोली व २) सात्विक दीपक सावडिया, वय २२ वर्षे, रा. सुभाष चौक, रायगड, जि. रायगड (छ.ग.) यांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांना ०५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम कोठून आली व पुढे कुठे वर्ग झाली, याबाबत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि. विनोद चव्हाण, पोस्टे गडचिरोली हे करीत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात, १७ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादीने फेसबुकवर Sajja Handloom नावाची बेडशीट विक्रीची जाहिरात पाहून व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला व एका बेडशीटसाठी ५५० रुपये ऑनलाईन पाठविले. त्यानंतर दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी PP Collection AC Comfuter set Bedsheets या नावाची आणखी एक जाहिरात पाहून तीन बेडशीटसाठी १,००० रुपये पाठविले. अशा प्रकारे एकूण १,५५० रुपये पाठवूनही ऑर्डर केलेला माल प्राप्त झाला नाही. संबंधित दुकानाच्या मूळ मालकाशी संपर्क केला असता त्यांच्या दुकानाच्या नावाचा वापर करून अज्ञात व्यक्ती ऑनलाईन फसवणूक करीत असल्याचे समोर आले.
याबाबत पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अप क्र. ११९२/२०२६, कलम ३१८ (४), ३१९ (२) भा.न्या.सं. २०२३ सहकलम ६६ (सी) (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर पोलिसांना तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांचे सखोल विश्लेषण करून आरोपी राजस्थान राज्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गडचिरोली पोलिसांचे पथक राजस्थान येथे रवाना होऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी साहिल जमशेद उर्फ साहिल जमशेद खान, वय २५ वर्ष, रा. सोमका, तह. पहाडी, जि. डीग (राजस्थान) यास दिनांक १०/१०/२०२६ रोजी मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली.
सक्षम न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड प्राप्त करून आरोपीस १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे आणण्यात आले आहे. आरोपीने आणखी किती नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक केली, फसवणूकीची रक्कम कोणत्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली, तसेच गुन्ह्यात वापरलेली फेसबुक खाती, मोबाईल, सिमकार्ड व या नेटवर्कमधील इतर साथीदारांबाबत पुढील तपास पोउपनि. प्रवीण बुंदे, पोस्टे गडचिरोली हे करीत आहे.
गडचिरोली पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन -
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि. ०१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान सायबर सुरक्षा जनजागृती महिना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सायबर गुन्हे व ऑनलाइन फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. याच जनजागृतीमुळे जागरूक झालेल्या नागरिकांनी सायबर फसवणुकीसंदर्भात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या. सदर तक्रारींची गांभीर्याने दखल घेत गडचिरोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.
गडचिरोली पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सोशल मीडियावर अतिशय कमी किमतीत वस्तू विक्रीच्या जाहिराती पाहून अनोळखी व्यक्तीच्या यूपीआय आयडी किंवा बँक खात्यावर पैसे पाठवू नयेत; खरेदीपूर्वी विक्रेत्याची विश्वासार्हता पडताळून घ्यावी. तसेच ओळखीच्या किंवा मित्र-मैत्रिणींच्या सांगण्यावरूनही आपल्या नावे बँक खाते उघडून देऊ नये आणि आपले बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक, सिमकार्ड व वैयक्तिक कागदपत्रे इतर कोणाच्याही वापरासाठी देऊ नयेत. अशा खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांमध्ये होत असून त्याची कायदेशीर जबाबदारी खातेधारकावरही येऊ शकते. ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी.
कारवाई करणारे पथक -
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिरोलीचे पोनि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.




Petrol Price




