बल्लारपुरात मध्यरात्री तलवार घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील बुद्धनगर वॉर्ड परिसरात मध्यरात्री तलवार घेऊन फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. अनस मेहमूद खान (वय १८), रा. गौसिया मशीद परिसर, बुद्धनगर वॉर्ड, बल्लारपूर असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून अंदाजे ५०० रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची गस्त घालत असताना गौसिया मशीद परिसरात एक तरुण धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संशयित तरुणाने हातातील शस्त्र बाजूला फेकून दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव अनस मेहमूद खान असल्याचे सांगितले.
पोलिसांनी परिसरात फेकलेली तलवार ताब्यात घेतली. या तलवारीची एकूण लांबी अंदाजे ७९ सेंटीमीटर असून, तिच्या पात्याची लांबी ६१ सेंटीमीटर आहे. सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पुरुषोत्तम चिकाटे, पोअं फुलचंद लोधी, शांतकुमार घोसे यांनी केले.




Petrol Price




