महत्वाच्या बातम्या

 मोहटोल्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ : धानपिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस


- शेतकरी प्रकाश कुमरे यांचे नुकसान; तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात असलेल्या मोहटोला परिसरात रानटी टस्कर हत्तींचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी पहाटे टस्कर हत्तीने शेतात प्रवेश करून धानपिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. या घटनेत मोहटोला येथील शेतकरी प्रकाश दाजिबा कुमरे यांच्या धानपिकाचे नुकसान झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पहाटेच्या सुमारास धानपिकाची नासधूस -
मिळालेल्या माहितीनुसार, मोहटोला परिसरात रानटी टस्कर हत्तींचा वावर आहे. सोमवारी पहाटे टस्कर हत्तीने शेतकरी प्रकाश दाजिबा कुमरे यांच्या शेतात प्रवेश केला. यावेळी हत्तीने शेतातील धानपिकाची नासधूस केली. मेहनतीने उभे केलेले पीक हत्तीच्या हल्ल्यात नुकसानग्रस्त झाल्याने कुमरे यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे.धान हे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असल्याने अशा घटनांमुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हत्तींच्या वावरामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण -
मोहटोला परिसरात रानटी हत्तींचा वावर कायम राहिल्यास आणखी शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी संबंधित वनविभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत द्या -
टस्कर हत्तीमुळे धानपिकाचे नुकसान झालेल्या शेतकरी प्रकाश दाजिबा कुमरे यांना संबंधित विभागाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि नियमानुसार भरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.वन्यहत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतीचे नुकसान होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.






  Print






Related Photos