महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्या बाहेर चारा विक्री व वाहतुकीवर निर्बंध 


- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्याच्या उद्देशाने नागपूर जिल्ह्यातील चाऱ्याची जिल्ह्याबाहेर विक्री व वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये ८ ऑक्टोबर रोजी आदेश निर्गमित केला आहे.खरीप हंगामात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू केल्या आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांचा समावेश दुष्काळाच्या निकषांत करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिल्यामुळे जिल्ह्यात चारा उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात उत्पादीत होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागांत मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात गंभीर चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने चाऱ्याच्या विक्री व वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.

हिरवा व वाळलेला चारा, कडबा, तनस, गवत, कुट्टी, पेंढा आणि टीएमआरवर निर्बंध- 
महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश, २००१ मधील तरतुदींनुसार नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, कडबा, तनस, गवत, कोणत्याही प्रकारची कुट्टी, पेंढा तसेच टीएमआर यांच्या विक्री व वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

शासकीय मंजुरी असलेल्या वाहतुकीला सूट -
शासकीय योजनेंतर्गत तसेच पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





  Print






Related Photos